पीटीआय, चंडीगड
पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यामध्ये सरहिंदू कालव्यामध्ये एक खासगी बस पडून झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या बसमध्ये साधारण ३५ प्रवासी होते.मुक्तसर-कोटकापुरा मार्गावर झाबेलवाली गावाजवळ हा अपघात झाला. बसचे ब्रेक लावले असता ती रस्त्यावरून घसरून कालव्यात पडली. अपघात झाला तेव्हा पाऊस पडत होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी पुढे दिली.
कालव्यात पडलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक बोलावण्यात आले. उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढली असून जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजूबाजूच्या गावकऱ्यांनीही प्रवाशांना वाचवण्यात मदत केली.