महिन्याभरापूर्वीच विस्तारा एअरलाईन्सच्या नाराज वैमानिकांनी सामूहिक दांडी मारल्यामुळे विस्तारा एअरलाईन्सला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता टाटा समूहाची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसलाही असाच फटका बसला आहे. वरिष्ठ क्रू सदस्यांनी आजारपणाचे कारण पुढे करत सामूहिक सुट्टी घेतल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड़्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच काही विमानांचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, “कालपासून शेवटच्या क्षणी आमचे काही कर्मचारी आजारी पडले असल्याचा निरोप आम्हाला मिळाला. त्यामुळे काही विमानांचे उड्डाण आम्हाला रद्द करावे लागत आहे. दरम्यान आम्ही कर्मचाऱ्यांशी संवाद साधून यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या प्रवाशांना झालेल्या मनस्तापाचे निराकरण लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” ज्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे, त्यांना तिकीटाचे पैसे परत केले जातील किंवा त्यांची इच्छा असल्यास पुन्हा नवी तिकीटे त्यांना दिली जातील, असेही या निवेदनात म्हटले आहे.
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी पुढे म्हटले की, प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी विमानतळाकडे निघण्यापूर्वी त्यांच्या विमानाची सद्यस्थिती तपासून घ्यावी. ज्यांचे विमान रद्द करण्यात आले आहे, त्यांना तात्काळ पैसे परत करण्याची सोय केली जाईल किंवा इतर तारखांचे तिकीट देण्याची व्यवस्था केली जाईल.
पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, कोची, कोलकाता आणि बंगळुरू या विमानतळांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
सामूहिक सुट्टीचे कारण काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्ट (पूर्वीचे नाव एअर एशिया इंडिया) यांचे विलीनीकरण होणार आहे. तसेच एअर इंडिया एक्सप्रेसने कर्मचाऱ्यांना बढती देण्यासाठी सेवाज्येष्ठतेवर आधारित प्रगती ग्राह्य धरण्याऐवजी गुणवत्तेवर आधारित प्रगतीला ग्राह्य धरण्याच्या प्रणालीकडे वाटचाल सुरू केल आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ केबिन क्रू सदस्यांनध्ये नाराजी पसरली आहे. तसेच नवीन केबिन क्रू सदस्यांची भरती केल्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भवितव्याबाबत चिंता वाटत आहे.
एअर इंडिया एकस्प्रेसमधील सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, एअरलाईन व्यवस्थापनाने अलीकडेच टॉऊन हॉलमध्ये सर्व नाराज कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलावून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मोकळेपणाने मांडावे यासाठी व्यवस्थापनाने सर्व संवादाचे मार्ग मोकळे केले होते.