हिमाचल प्रदेशसोबतच उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे या भागातील यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून हिमाचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे हिमाचलमधील सर्वच नद्या दुधडीभरून वाह्त आहेत. परिणामी मुसळधार पावसामुळे कांगडा जिल्ह्यात पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चक्की नदीवर उभारण्यात आलेल्या ८०० मीटर लांब रेल्वे पूल कोसळल्याची घटना घडली आहे. पूल कोसळताचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ९० वर्ष जूना पूल पत्त्यासारखा कोसळताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चक्की नदीला अचानक आलेल्या पुरामुळे रेल्वे पुलाचे खांब खिळखिळे झाले होते आणि त्यामुळे हा पूल कोसळला. सुदैवाने हा पूल कोसळला तेव्हा यावर कोणीही नव्हतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पुलाचे बांधकाम होईपर्यंत पठाणकोठ ते जोगिंदरनगर दरम्यान नॅरोगेज रेल्वे सेवा बंद राहणार आहे. १९२८ मध्ये ब्रिटिशांनी हा नॅरोगेज रेल्वे मार्ग सुरू केला. या पुलावरून ७ रेल्वे गाड्या धावत होत्या.

हेही वाचा- राजस्थानच्या पाली जिल्ह्यात भीषण अपघात; ६ भाविकांचा मृत्यू तर २० जण जखमी

उत्तराखंडमध्ये ढगफूटी

हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असून येथील सर्व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय उत्तराखंडमध्ये सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचा धोका वाढला आहे.

हेही वाचा- मथुरेतील ‘बांके बिहार’ मंदिरात चेंगराचेंगरी; २ भाविक ठार, अनेक जखमी

मंडीमध्ये भूस्खलन

मंडी येथे मुसळधार पावसामुळे एक घर भूस्खलनामुळे जमीनदोस्त झाले आहे. कुटुंबातील आठ सदस्य मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या स्थानिक लोक अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Story img Loader