पाकिस्तानातील क्वेट्टा शहरात शनिवारी सायंकाळी शिया समुदायाला लक्ष्य ठेवून केलेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या रविवारी ८१वर पोहोचली असून २०० हून अधिक जखमी झाले आहेत. या भीषण बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिया समाजाची अधिक लोकसंख्या असलेल्या भागात गर्दीच्या वेळी हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए झागवी या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
क्वेट्टामधील हजारा भागातील किरानी मार्गावर शनिवारी सायंकाळी हा बॉम्बस्फोट झाला. पाण्याच्या टँकरमध्ये लपवून ठेवलेल्या शेकडो किलो वजनाच्या बॉम्बच्या स्फोटात ४० लोक जागीच मरण पावले या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या अनेकांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या बॉम्ब हल्ल्यासाठी सुमारे ८०० किग्रॅ वजनाची स्फोटके वापरण्यात आल्याचेही बोलले जाते. या स्फोटाने सहा फूट खोल आणि सुमारे २०० फूट लांबीचा खड्डा तयार झाला.
या भीषण हल्ल्याची जबाबदारी बंदी घातलेल्या लष्कर ए झागवी या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. संघटनेचा प्रवक्ता अबुबाकर सिद्धिकी याने दूरध्वनीवरून पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शिया समुदायाच्या लोकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यासाठी आत्मघातकी पथकाचा वापर झाल्याबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. १० जानेवारी रोजी क्वेट्टातील शिया समुदायाला लक्ष्य करून दोन आत्मघातकी हल्ले करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे ९० जणांचा बळी गेला होता. शनिवारी झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर शिया समुदाय तसेच अनेक राजकीय पक्षांनी रविवारी बंदची हाक दिली होती तर सात दिवसांचा शोक पाळण्याचे आवाहन करण्यात आले. पाकिस्तानातील शिया समुदायावर दहशतवादी संघटनांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. मानवी हक्क आयोगाच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात ४०० शिया नागरिकांची हत्या करण्यात आली होती.

Story img Loader