आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील तब्बल ८१ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये तब्बल चार कोटी तरुण मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. शनिवारी राष्ट्रीय मतदार दिन असून या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही माहिती जाहीर केली.
२००९ साली पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा २०१४ च्या निवडणुकीसाठी १० कोटी अधिक मतदारांची भर पडली आहे. गेल्या तीन महिन्यांत ३.९१ कोटी नवे मतदार नोंदले गेले असून त्यामध्ये १.२७ कोटी हे १८-१९ या वयोगटातील असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे महासंचालक अक्षय राऊत यांनी दिली.  २०१३ मधील मतदार दिनी २.३२ कोटी मतदारांची भर पडली होती. त्यामध्ये ९३ लाख हे १८-१९ वयोगटातील होते.  राष्ट्रीय मतदार दिनाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे येथील विज्ञान भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात भाषण करणार आहेत.
अद्याप नोंदणी न केलेल्या नागरिकांनी मतदार नोंदणीत नाव नोंदविण्यासाठी देशभरातील ८.५ लाख केंद्रांवर ६.५ लाख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या पाश्र्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी प्रत्येक सज्ञान नागरिक मतदान करण्यास पात्र ठरावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.