नवी दिल्ली :भारतात सोमवारी ८५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले, ही संख्या ५ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या लसीकरणाच्या जवळपास दुप्पट आहे. या नव्या विक्रमामुळे भारतात ऑगस्ट महिन्यापर्यंत दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जर दररोज ७५ लाख लोकांचे लसीकरण करण्याचे ठरविण्यात आले तर १८ वर्षांवरील सर्व प्रौढांचे म्हणजे ९४.०२ कोटी लोकांचे लसीकरण होण्यास किती कालावधी लागेल?
देशातील बहुसंख्य जणांचे अद्याप लसीकरण झालेले नाही, २० जूनपर्यंत २२.८७ कोटी लोकांचे अंशत: लसीकरण झाले आहे तर ५.१२ कोटी लोकांचे पूर्णत: (दोन्ही मात्रा) लसीकरण झाले याचा अर्थ २८ कोटी लोकांचे अंशत: अथवा पूर्णपणे लसीकरण झाले. याचा अर्थ देशात अद्याप जवळपास ६६.०२ कोटी लोकांचे लसीकरण करावे लागणार आहे, म्हणजे ६६.०२ कोटी मात्रांची अंशत: लसीकरणासाठी तर १३२.०४ मात्रांची पूर्ण लसीकरणासाठी गरज आहे. जर आता देशात दररोज ७५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले तर संपूर्ण प्रौढ व्यक्तींच्या अंशत: लसीकरणासाठी ८८ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
संपूर्ण प्रौढ लोकांचे पूर्ण लसीकरण करण्यासाठी भारताला ८८.८९ कोटी लोकांचे लसीकरण करावे लागणार आहे. त्यापैकी २२.८७ कोटी लोकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे आणि पूर्ण लसीकरणासाठी आणखी तेवढय़ाच मात्रांची गरज आहे. ज्या ६६.०२ लोकांचे लसीकरण झालेले नाही त्यांच्यासाठी १३२.०४ लस मात्रांची गरज आहे. जर दररोज ७५ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले तर ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशा ६६.०२ कोटी लोकांना लशीच्या दोन मात्रा देण्यासाठी १७६ दिवस लागणार आहेत आणि त्यामध्ये दोन मात्रांमधील अंतर आणि लसीकरण न झालेल्या २२.८७ कोटी लोकांसाठी लागणारे ३१ दिवस पाहता देशवासीयांचे पूर्ण लसीकरण होण्यासाठी २०७ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
देशात सध्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-५ या लशींचा वापर केला जातो. या तीनही लशींच्या दोन मात्रा घ्याव्या लागतात आणि दोन लशींमधील अंतराचा कालावधी वेगवेगळा आहे. कोव्हिशिल्ड ही सध्या भारतात देण्यात येणारी प्रमुख लस आहे.
९१ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद
नवी दिल्ली : देशात गेल्या एका दिवसात ५० हजारांहून कमी जणांना करोनाची लागण झाली असून हा गेल्या ९१ दिवसांमधील नीचांक आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या दोन कोटी ९९ लाख ७७ हजार ८६१ वर पोहोचली असून ७९ दिवसांनंतर उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाखांपेक्षा कमी झाली आहे, असे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.गेल्या २४ तासांत ४४ हजार ६४० जणांना करोनाची लागण झाली तर ११६७ जणांचा मृत्यू झाला. हा गेल्या ६८ दिवसांमधील नीचांक आहे, त्यामुळे मृतांची एकूण संख्या तीन लाख ८९ हजार ३०२ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या सहा लाख ६२ हजार ५२१ वर पोहोचली असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या २.२१ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा झाली असून ते सध्या ९६.४९ टक्के इतके आहे. गेल्या एका दिवसात ११६७ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी ३५२ जण महाराष्ट्रातील आहेत, तर आतापर्यंत एकूण तीन लाख ८९ हजार ३०२ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी एक लाख १८ हजार ३१३ जण महाराष्ट्रातील आहेत.
भारतात फायझरच्या लशीला मान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
वॉशिंग्टन : अमेरिकेतील औषध कंपनी फायझर भारतात करोनाप्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्याबाबत भारताशी लवकरच करार करणार आहे, कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. अल्बर्ट बोर्ला यांनी मंगळवारी सांगितले. भारतीयांचे लसीकरण करण्यासाठी देशात उत्पादन करण्यात आलेली ही लस महत्त्वाची ठरणार आहे, असे ते म्हणाले.
अमेरिका-भारत चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने इंडिया-यूएस बायोफार्मा अॅण्ड हेल्थकेअरच्या १५ व्या परिषदेत ते बोलत होते. भारतासह मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील देशांना या लशीच्या जवळपास दोन अब्ज मात्रा उपलब्ध होतील, असे डॉ. बोर्ला म्हणाले. भारतीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून लवकरच उत्पादनाला मान्यता मिळेल आणि भारत सरकारशी त्याबाबत करार केला जाईल आणि त्यामुळे आम्ही लस पाठविण्यास सुरुवात करू अशी अपेक्षा डॉ. बोर्ला यांनी व्यक्त केली.