झारखंड राज्यातील धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वती या प्रभू श्रीरामाच्या भक्त आहेत. राम मंदिरासाठी त्यांनी मागच्या ३० वर्षांपासून मौन व्रत घेतलेले आहे. आता २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर त्या मौन व्रत सोडणार आहेत. अयोध्येत बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर सरस्वती यांनी मौन व्रत धारण केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनबाद जिल्ह्यातील सरस्वती देवी यांनी १९९० पासून एक शब्दही उच्चारलेला नाही. अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी त्यांनी हे व्रत घेतले होते. सरस्वती देवी यांच्या कुटुंबियांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, अयोध्येत राम मंदिर उभारले जात नाही, तोपर्यंत मौन बाळगणार असा प्रण त्यांनी केला होता. आता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या आपले व्रत सोडतील. सोमवारी (८ जानेवारी) त्या अयोध्यात जाण्यासाठी धनबादहून रवाना झाल्या.

सरस्वती देवी यांना धनबाद जिल्ह्यात मौनी माता म्हणून लोकप्रिय आहेत. त्या आपल्या कुटुंबियांशी हातवारे करून संवाद साधतात. तसेच लिहूनही त्या आपले म्हणणे मांडतात. मध्यंतरी त्यांनी मौन व्रतामध्ये थोडासा विश्राम घेतला होता. २०२० साली त्या रोज दुपारी एक तास बोलत असत. ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूज केले. त्यादिवशी त्यांनी पुन्हा दिवसभराचे मौन व्रत धारण केले.

सरस्वती देवी यांचे छोटे सुपुत्र ५५ वर्षीय हरेराम अग्रवाल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मशिदीचे पतन झाले, तेव्हापासून माझ्या आईने अयोध्येत राम मंदिराचे निर्माण व्हावे, यासाठी मौन व्रत घेतले. राम मंदिराचे उदघाटन करण्याची तिथी जेव्हा जाहीर झाली, तेव्हापासून माझी आई आनंदात आहे. अयोध्येतील महंत नृत्य गोपाल दास यांच्या त्या शिष्या आहेत. त्यामुळे त्यांना अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले आहे. त्यानुसार ८ जानेवारी रोजी त्या अयोध्येसाठी रवाना झाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: year old devotee to break 30 year maun vrat after ram mandir consecration kvg