दिल्लीच्या जहाँगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली, तसेच अनेक वाहने पेटवून देण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. या हिंसाचारत नऊ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्व वातावरण आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची दखल घेतली आहे.

‘ही पारंपरिक मिरवणूक होती आणि पोलीस पथक तिच्यासोबत होते. मात्र ती कुशल चित्रपटगृहाजवळ पोहोचल्यानंतर दोन समुदायांत संघर्ष झाला. हा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले’, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिला आहे. परिस्थिती आता नियंत्रणात असून, जहाँगीरपुरीसह इतर संवेदनशील भागांत जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना आणि विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवसथा) दिपेंद्र पाठक यांच्याशी चर्चा केली असून संवेदशनीलपणे प्रकरण हाताळताना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनेचा निषेध केला असून कायदा-सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे.

नऊ जण जखमी –

या हिंसाचारात एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यामध्ये आठ पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांना बाबू जगजीवन राम मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाला गोळी लागल्याने जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

१४ जणांना अटक

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून १४ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकावर गोळीबार सुरु केल्याचा आरोप आहे. ही पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.