पीटीआय, हैदराबाद
हैदराबादच्या नामपल्ली भागातील एका निवासी इमारतीत सोमवारी लागलेल्या भीषण आगीत दोन कुटुंबातील नऊ जण गुदमरून मरण पावले, तर एक जण जखमी झाल्याचे पोलीस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.आगीमुळे उफाळलेल्या ज्वाळांसह इमारतीवर पसरलेला धूर नाकातोंडात गेल्यामुळे नऊ जण बेशुद्धावस्थेत आढळले. बचाव पथकांनी त्यांना एका सरकारी रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
निवासी संकुलाच्या पार्किंगच्या जागेत ठेवलेल्या ज्वलनशील रसायनांच्या पिंपांना आग लागली व ती इमारतीच्या वरच्या भागात पसरली, असे पोलिसांनी सांगितले. या संकुलात तळमजला आणि वरचे चार मजले आहेत. या भागातील मुलांनी फोडलेल्या फटाक्यांतून उडालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.