बंगळूरु : रेणुकास्वामी हत्येप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगूदीपा याला विशेष वागणूक दिल्याच्या आरोपाखाली मुख्य तुरुंग अधीक्षक व्ही. सेशुमूर्ती आणि तुरुंग अधीक्षक मल्लिकार्जुन स्वामी यांच्यासह नऊ तुरुंग अधिकाऱ्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले.
हेही वाचा >>> Janmashtami 2024 : इस्कॉन मंदिरात मोठी गर्दी, चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज
शहरातील परप्पाना अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहात दर्शन कॉफीचा मग हातात घेऊन धूम्रपान करतानाची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर चौकशी करून ही कारवाई करण्यात आली. दोन कुख्यात गुन्हेगारांसह इतर तीन जणांबरोबर दर्शन तुरुंगाच्या आवारातील हिरवळीवर आरामात बसलेले या छायाचित्रात दाखविण्यात आले आहे. ही छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर कर्नाटक सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आणि तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी याची दखल घेऊन नऊ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. सात अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले, तर कारागृहाला भेट देऊन अधिक माहिती गोळा केल्यानंतर
मुख्य कारागृह अधीक्षक शेषमूर्ती आणि अधीक्षक मल्लिकार्जुन स्वामी यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात त्यांचीच चूक असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. अभिनेत्याला सिगारेट, चहा आणि खुर्च्या कोणी पुरवल्या याचाही तपास केला जाईल, असेही ते म्हणाले.