मानवी मेंदूवर बेतलेली एक मायक्रोचिप तयार करण्यात आली असून ती नेहमीच्या संगणकातील चिपपेक्षा ९००० पट वेगवान आहे. त्यामुळे यंत्रमानवशास्त्र व संगणकाच्या क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे, त्याचबरोबर मेंदूच्या कामाचे आकलनही वाढणार आहे. कृत्रिम अवयवांच्या हालचाली अधिक त्वरेने करता येणेही त्यामुळे शक्य होणार आहे.
उंदराच्या मेंदूत आपल्या संगणकापेक्षा ९००० पट वेगाने क्रिया होत असतात. त्यामुळे आपला संगणक हा नेहमी हळूच चालत असतो असा याचा अर्थ होतो. त्यामुळे संगणक ४० हजार पटींनी अधिक वीज खातो असे स्टॅनफर्ड विद्यापीठाचे जैवअभियांत्रिकीचे प्राध्यापक क्वाबेना बोहेन यांनी म्हटले आहे. बोहेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यूरोग्रीड हे सर्किट तयार केले असून त्यात आपल्या मेंदूतील १० लाख न्यूरॉन्स व अब्जावधी सिनॅप्टिक जोडण्यांनी साधले जाणारे काम केले जाते. या चिपच्या माध्यमातून आयपॅडसारखे साधन तयार करण्यात आले असून जादा वेग व कमी वीज लागणारे हे साधन न्यूरोग्रीड सर्किटवर चालते व त्याची किंमत ४० हजार अमेरिकी डॉलर आहे.