नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या साडे पंधरा लाख कोटी रुपयांपैकी १४ लाख कोटी रुपये बँकांकडे जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जवळपास साडे पंधरा लाख कोटी रुपये चलनातून रद्द झाले होते. या रद्द झालेल्या नोटांपैकी १४ लाख कोटी रुपये किमतीच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रद्द करण्यात आलेल्या साडे पंधरा लाख कोटी रुपयांपैकी ३ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा होणार नाही, असा केंद्र सरकारचा अंदाज होता. देशात ३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा आहे आणि हा पैसा नोटाबंदीनंतर आपोआप चलनातून बाद होईल, असा सरकारचा अंदाज होता. मात्र सरकारचा हा अंदाज चुकताना दिसतो आहे.

३ लाख कोटींचा काळा पैसा चलनातून बाद झाल्याने रिझर्व्ह बँकेकडून पुरेसा लाभांश मिळेल, अशी अपेक्षा सरकारला होती. मात्र तब्बल १४ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्याने सरकारची अपेक्षा फोल ठरली आहे. बँकांमध्ये जमा झालेल्या १४ लाख कोटींच्या नोटा लक्षात घेता, ही बेहिशोबी रक्कम असल्याचा सरकारचा अंदाज आहे. एका व्यक्तीला फक्त अडीच लाख रुपये बँक खात्यात जमा करता येतील, असे सरकारने सांगितले होते. मात्र अनेकांनी यापेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात जमा केली आहे. त्यामुळे यातून कररुपी महसूल मिळेल, अशी अपेक्षा सरकारला आहे.

याआधी सरकारने लोकांनी त्यांच्याकडे असणारा काळा पैसा स्वत:हून जाहीर करावा, यासाठी अभय योजना आणली होती. बेहिशोबी पैसा स्वत:हून जाहीर करणाऱ्या व्यक्तीला त्याने जाहीर केलेल्या रकमेवर ५० टक्के दंड आकारुन २५ टक्के रक्कम गरिबांच्या कल्याणासाठी वापरली जाईल, अशी सरकारची योजना होती. काळा पैसाधारकांना अभय देणाऱ्या योजनांमधून बराचसा काळा पैसा हाती लागेल, अशी आशा सरकारला होती. मात्र या योजनेला लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.