पीटीआय, अहमदाबाद
मध्य प्रदेशात भोपाळमधील एका कारखान्यातून १८१४ कोटी रुपयांचे ९०७.०९ किलो मेफेड्रॉन (एमडी) आणि ते बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

जप्त केलेले मेफेड्रॉन घन आणि द्रव स्वरुपात होते. गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि दिल्लीतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. गुजरात एटीएसने निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार भोपाळजवळ बगरोडा औद्याोगिक विभागात संबंधित कारखाना होता. या कारखान्याची दररोज २५ किलो एमडी बनविण्याची क्षमता होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एमडी जप्त करण्याची गुजरात एटीएसची ही प्रथमच वेळ आहे.

हेही वाचा : Tensions in Goa: संघाच्या माजी नेत्यामुळं गोव्यात तणाव; ख्रिश्चन समुदायाकडून आंदोलन तर राहुल गांधींची भाजपावर टीका

संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यावेळी मोठ्या प्रमाणावर एमडीचे उत्पादन सुरू होते. छाप्यात ९०७.०९ किलो एमडी जप्त करण्यात आले. त्याची किंमत १८१४.१८ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी अमित चतुर्वेदी (वय ५७) आणि सन्याल बाने (वय ४०) या दोघांना अटक करण्यात आली.

आंबोली येथील प्रकरणात बानेला शिक्षा

कारवाईवेळी अटक करण्यात आलेल्या सन्याल बाने याने यापूर्वीदेखील तुरुंगाची हवा खाल्ली आहे. महाराष्ट्रातील आंबोली येथील एमडी प्रकरणात २०१७ मध्ये बानेला अटक झाली होती. त्याला पाच वर्षांची शिक्षाही झाली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याने चतुर्वेदीबरोबर एमडीच्या बेकायदा उत्पादनाचा कट रचला. भोपाळजवळ सहा महिन्यांपूर्वी कारखाना त्यासाठी भाड्याने घेतला.

हेही वाचा : Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; तीन जणांचा मृत्यू, २३० जणांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

कारवाईत काय जप्त केले ?

९०७.०९ किलो एमडी (किंमत – १८१४.१८ कोटी रुपये)

एमडी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल ( पाच हजार किलो) – रसायने आणि इतर साहित्याचा समावेश