Jail Inmates To Take Holy Bath In Maha Kumbh Mela: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभमेळ्याची येत्या काही दिवसांत सांगता होणार आहे. अशात उत्तर प्रदेशातील ७५ तुरुंगांमधील कैद्यांना विशेष पद्धतीने महाकुंभमेळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासन प्रयागराजच्या संगमातून पवित्र पाणी आणून सर्व तुरुंगांमध्ये कैद्यांच्या स्नानाची व्यवस्था करत आहे. उत्तर प्रदेशचे तुरुंग मंत्री दारा सिंह चौहान यांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० ते १० या वेळेत सर्व तुरुंगांमध्ये हा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. . राज्यभरातील तुरुंगांमध्ये एकूण ९० हजारांहून अधिक कैदी आहेत, ज्यामध्ये सात मध्यवर्ती कारागृहांचाही समावेश आहे.
२१ फेब्रुवारी रोजी लखनौ तुरुंगात विशेष कार्यक्रम
याबाबत बोलताना कारागृह महासंचालक पी.व्ही. रामशास्त्री म्हणाले की, “ही विशेष व्यवस्था तुरुंग मंत्र्यांच्या देखरेखीखाली केली जात आहे. संगमामधून आणलेले पवित्र पाणी तुरुंगातील लहान पाण्याच्या टाक्यांमध्ये भरले जाईल आणि नंतर ते कैद्यांच्या आंघोळीसाठी वापरले जाईल. २१ फेब्रुवारी रोजी लखनौ तुरुंगात होणाऱ्या कार्यक्रमात तुरुंग मंत्री दारा सिंह चौहान आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी उन्नाव तुरुंगात कैद्यांसाठी स्नानाची सोय
यापूर्वी १७ फेब्रुवारी रोजी उन्नाव तुरुंगात कैद्यांसाठी अशाच प्रकारे स्नान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उन्नाव तुरुंगाचे अधीक्षक पंकज कुमार सिंह म्हणाले की, “याचा बऱ्याच काळापासून विचार केला जात होता आणि आता २१ फेब्रुवारी रोजी कैद्यांना पुन्हा पवित्र संगमातील पाण्याने स्नान करण्याची संधी मिळणार आहे.”
दरम्यान प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभमेळ्याची २६ फेब्रुवारी रोजी सांगता होणार संपणार आहे. अशात तुरुंग प्रशासनाने तुरुंगातील कैद्यांनाही महाकुंभमेळ्यात वेगळ्या पद्धतीने सहभागी होण्याची संधी दिली आहे.
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी
दरम्यान यंदाचा महाकुंभमेळा विविध मुद्द्यांनी गाजला आहे. महाकुंभमेळ्या दरम्यान अनेक बऱ्या-वाईट घटनाही घडल्या आहेत. महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन वेळा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाले होते. यानंतर, १५ फेब्रुवारीच्या रात्री, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांत, महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे, अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडीही होत आहे.