बांगलादेश निर्मितीच्या वेळी १९७१मध्ये केलेल्या युद्ध गुन्ह्य़ांना जबाबदार असल्याबद्दल ‘जमात-ए-इस्लामी’चे सर्वेसर्वा गुलाम आझम यांना बांगलादेशच्या विशेष न्यायालयीन लवादाने मंगळवारी ९०वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. युद्धजन्य गुन्ह्य़ांप्रकरणी हा सर्वात महत्त्वाचा असा पाचवा निकाल आहे. बांगलादेशात झालेल्या युद्धाच्या वेळी घडलेल्या अत्याचारांना आझम हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
‘आझम यांना ९० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल’ असे ‘इण्टरनॅशनल क्राइम्स ट्रायब्युनल-१’च्या त्रिसदस्यीय पीठाचे अध्यक्ष एम. फाझल कबीर यांनी न्यायालयात घोषित केले. विशेष म्हणजे आझम हे स्वत: ९१ वर्षांचे असून या निकालामुळे त्यांना आता उर्वरित सर्व आयुष्य तुरुंगवासातच कंठावे लागेल, हे स्पष्ट झाले आहे.
आझम यांच्या शिक्षेची घोषणा झाल्यानंतर या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’च्या समर्थकांनी ढाका व अन्य शहरांत हिंक निदर्शने केली.
आझम यांनी १९७१मध्ये पाकिस्तानची बाजू घेऊन केलेले गुन्हे लक्षात घेता त्यांना खरे म्हणजे मृत्युदंडच द्यायला हवा होता, परंतु त्यांची शारीरिक अवस्था आणि वय लक्षात घेता त्यांना ९० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे, असे निकालपत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले. गुलाम आझम यांचे प्रकरण हे तसे वेगळे प्रकरण आहे. सदर गुन्ह्य़ांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी हे गुन्हे त्यांच्या सांगण्यावरून घडल्याचेही निकालपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा