नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षाभंगप्रकरणी लोकसभेत फलक घेऊन आलेले केरळ काँग्रेस (एम)चे सी. थॉमस आणि माकपचे ए. एम. आरिफ या आणखी दोन विरोधी खासदारांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे संसदेतील निलंबित खासदारांची संख्या १४३ झाली असून दोन्ही सदनांमध्ये ‘इंडिया’ महाआघाडीतील फक्त ९३ खासदार उरले आहेत.
लोकसभेमध्ये काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे १०, तृणमूल काँग्रेसचे ९, तर द्रमुकच्या ८ खासदारांवर अद्याप तरी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. लोकसभेत ‘इंडिया’चे ४३ खासदार निलंबनमुक्त असल्याने ते अधिवेशनाच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात. मात्र, बुधवारी यापैकी एकही खासदार सभागृहामध्ये उपस्थित नव्हता.
हेही वाचा >>>‘हिट अँड रन’ची शिक्षा कमी होणार, जामीन मिळण्यातले अडथळे दूर; नवी फौजदारी विधेयके ‘शिक्षे’ऐवजी ‘न्याय’ देणारी?
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, मनमोहन सिंग, शरद पवार, राघव चड्ढा, संजय राऊत, शिबू सोरेन, मिसा भारती, जयंत चौधरी आदी ‘इंडिया’च्या ५० खासदारांवर निलंबनाची कारवाई झालेली नाही. संसदेतील सुरक्षाभंगाच्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी खासदार करत होते. त्यांच्या न्याय्य मागणीला अव्हेरून १४३ खासदारांना निलंबित करण्यात आले असून ही कारवाई ताबडतोब मागे घ्यावी, अशी मागणी खरगे यांनी संसदेबाहेर केली.दोन्ही सदनांमधील बहुतांश विरोधी खासदारांना निलंबित केल्यामुळे दिवसभर सभागृहांमध्ये प्रचंड शांतता होती. विरोधी बाकांवरच नव्हे तर सत्ताधारी बाकांवरही तुरळक हजेरी होती.
जंतर-मंतरवर आंदोलन
‘इंडिया’च्या खासदारांवर झालेल्या सामूहिक निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी दिल्ली युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जंतर-मंतरवर आंदोलन केले. त्यामुळे संसदेच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. या परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली होती. तरीही पोलिसांची तटबंदी मोडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.