लष्करे तैय्यबा या दहशतवादी संघटनेमध्ये दाखल होणाऱया तब्बल ९४ टक्के प्रशिक्षणार्थी दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर हा युद्धजन्य प्रदेश असल्याचे वाटते. त्याचबरोबर या संघटनेत दाखल होणारे बहुतांश पाकिस्तानी नागरिक हे पंजाब प्रांतातून आलेले असून, त्यांची पाकिस्तानातील लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेमध्ये चांगली ओळख असल्याचेही अमेरिकेने केलेल्या पाहणीत आढळून आले. अमेरिकेतील लष्करी अकादमीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला.
अमेरिकेतील प्रख्यात लेखक सी. ख्रिस्तिन फेअर, डॉन रासलेर आणि अनिर्बान घोष यांनी या अहवालाचे लिखाण केले. लष्करे तैय्यबाच्या सुमारे ९०० मृत्युमुखी पडलेल्या दहशवाद्यांच्या चरित्रांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
पाहणीतील ठळक मुद्दे…
- पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून लष्करे तैय्यबामध्ये सर्वाधिक भरती
- भरतीमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण जास्त
- केवळ पुरुषांचीच भरती
- पंजाब प्रांतातील गुरजानवाला, फैसलाबाद, लाहोर, शेखूपुरा, कासुर, सियालकोट, मुल्तान इत्यादी शहरांतून भरती
- पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद आणि अफगाणिस्तानमध्ये दहशवाद्यांचे प्रशिक्षण
- काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला आणि पूंछ या तीन जिल्ह्यांमध्ये लष्करे तैय्यबाच्या सुमारे निम्म्या दहशतवाद्यांचा मृत्यू.
- कुपवाडामध्ये सर्वाधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश