इस्लामाबाद : पाकिस्तानमधील अनेक भागांत आलेल्या पुराचा ३ कोटी ३ लाख नागरिकांना फटका बसला. तर, ९८२ जणांचा बळी गेला असून एक हजार ४५६ जण जखमी झाले. या संकटानंतर शहबाज शरीफ यांच्या सरकारला मदत कार्यासाठी शनिवारी लष्कराला पाचारण करावे लागले.आपत्ती व्यवस्थापन दलाने सांगितले की, तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक रस्ते आणि सुमारे १५० पूल आणि सुमारे सात लाख घरांचे नुकसान झाले आहे.
पाकिस्तानमधील हवामान विभागाने पुढील आठवडय़ात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुरामुळे सध्या निम्म्याहून अधिक देश पाण्याखाली आहे. मोसमी मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात लाखो नागरिक बेघर झाले. तर, ५७ लाख नागरिकांना निवारा आणि अन्न पुरविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. पुराचा सर्वाधिक तडाखा खैबर-पख्तूनख्वा, बलूचिस्तान आणि सिंध या प्रांतांना बसला आहे. या भागात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडत आहे.
पुरात रस्ते आणि पुल वाहून गेले असल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले असून मोठय़ा प्रमाणात पशूंचा बळी गेला आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इस्लामाबाद येथील राजदूत, उच्चायुक्त आणि काही मोजक्या राजकीय नेत्यांबरोबर शुक्रवारी चर्चा केली. या वेळी त्यांनी देशातील भीषण पुराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्याच्या आकडेवारीनुसार यंदाच्या पुराची तुलना २०१०-११ मध्ये आलेल्या पुराबरोबर करता येईल.