तो अक्षरश: पैशांवर लोळतो आहे, अशा शब्दांत एखाद्या धानिकाचे वर्णन केले जाते. मात्र पैशांवर लोळण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रकार त्रिपुरातील माकपच्या एका नेत्याने केल्याचे उघडकीस आल्याने संतापाची लाट पसरली आहे. इतकेच नव्हे तर या कृतीमुळे माकपचा हा नेता चांगलाच अडचणीत आला आहे.
जोगेंद्रनगर कमिटीचा सदस्य आणि व्यवसायाने कंत्राटदार असलेला समर अचारजी हा नेता स्वत:च्याच बँक खात्यातून काढलेल्या चलनी नोटांच्या बंडलांची शय्या करून त्यावर लोळत पडला असल्याचे दूरदर्शनवरील एका फुटेजमधून स्पष्ट झाल्याने त्रिपुरात संतापाची लाट उसळली आहे.
आपण आपल्या बँकेच्या खात्यातून २० लाख रुपयांची रोकड काढली आणि त्या नोटांच्या बंडलांची शय्या करून त्यावर लोळण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले, असे अचारजी सांगत असल्याचेही फुटेजवरून स्पष्ट होत आहे. अन्य नेत्यांकडे खूप माया असतानाही ते आपण श्रमजीवी असल्याचे चित्र रेखाटतात, त्यांच्यासारखे आपण ढोंगी नाही, असे वक्तव्यही अचारजी यांनी केल्याने ते पक्षासाठी अधिक हानिकारक असल्याचे मानले जात आहे.
अचारजी यांनी आपल्या भ्रमणध्वनीवरून स्वत:चेच फुटेज तयार केले आणि ते त्यांच्याच एका मित्राने दूरदर्शनकडे सोपविले, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे माकपचे राज्य सचिव बिजन धर यांनी सांगितले. माकपच्या आगरतळा सदर विभागीय समितीने याबाबत चौकशी पूर्ण केली असून त्यासंदर्भात सविस्तर चर्चा केल्यानंतर अचारजी यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
अचारजी यांच्या कृत्याची संधी साधून काँग्रेसचे नेते रतनलाल नाथ यांनी मार्क्‍सवादी नेते आणि मंत्र्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. माकप हा पक्ष भ्रष्टाचारी असून सार्वजनिक निधीचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांनी खूप माया जमविली असल्याचे या फुटेजवरून स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A bed of cash tripura cpim leader fulfills long cherished dream
Show comments