बिहारची राजधानी पटनाजवळील मणेर गावात बोटीला अपघात झाला आहे. ५० ते ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट शेरपूर घाटाजवळ गंगा नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या अपघातातील ४५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तर १० प्रवासी अजूनही बेपत्ता आहे. एनडीआरएफकडून या बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे.
दोन बोटींची धडक
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीच्या एका काठावरुन तीन बोटींमधून काही लोक चारा कापून आपापल्या घरी परतत होते. दरम्यान, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन बोटींची धडक झाली. बोटीवरील बहुतांश लोक दानापूर शाहपूर भागातील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूला मोठी गर्दी झाली. त्यानंतर शहापूर संबंधित घटनेची यंत्रणांना माहिती देण्यात आली असून तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं.
४५ प्रवासी सुखरुप तर १० प्रवाशांचा अद्याप शोध सुरु
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत दाऊदपूरचे राहणारे काही नागरिक रविवारी गंगा नदी पार करुन गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. चारा गोळा करुन हे सर्वजण तीन घरी परतत होते. नदीतून काठावर येत असताना, अचानक नदीचा प्रवाह बदलला आणि दोन बोटींनी एकमेकांना धडकल्या. त्यातली एक बोट पलटली आणि त्या बोटीतील ५५ प्रवासी नदीत बुडाले. स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती यंत्रणा आणि पोलिसांना दिली. पोलीस आणि यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. बोटीतील ४५ प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. तर १० प्रवाशी बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.
याआधी म्हणजे १२ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील बांदा येथे बोटीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमने १३ लोकांना वाचवले होते.