आंध्र प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर टीडीपीचं सरकार सत्तेत आलं. विधानसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत, तर या निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांना फारसं यश मिळवता आलं नाही. आता आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर एका आमदाराने गंभीर आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासह दोन आयपीएस अधिकाऱ्यांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जगन मोहन रेड्डी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, टीडीपीचे आमदार रघुराम कृष्ण राजू यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आमदार रघुराम कृष्ण राजू यांनी जगन मोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

हेही वाचा : Samvidhaan Hatya Diwas : मोठी बातमी! ‘या’ दिनी पाळणार ‘संविधान हत्या दिन’; केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा!

नेमकं प्रकरण काय?

आंध्र प्रदेशचे टीडीपी पक्षाचे आमदार रघुराम कृष्ण राजू यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच जगन मोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करत आयपीएस अधिकारी पीव्ही सुनील कुमार, पीएसआर सीतारामनजनेयुलु, निवृत्त पोलीस अधिकारी आर विजय पॉल, जी प्रभावती यांच्याही नावाचा समावेश या गुन्ह्यात करण्यात आला आहे.

जगन मोहन रेड्डींवर गंभीर आरोप

आमदार रघुराम कृष्ण राजू यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात आता त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असं आमदार रघुराम कृष्ण राजू यांनी म्हटलं आहे. तसेच तक्रारीत म्हटलं की, माझा कोठडीत अतोनात छळ करण्यात आला. तसेच जगन मोहन रेड्डी यांच्या सांगण्यावरून सीआयडी अधिकारी पीव्ही सुनील कुमार आणि इतर काही पोलिस अधिकाऱ्यांनी बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली. तसेच जगन मोहन रेड्डी यांनी हृदयाशी संबंधित आजारासाठी औषध घेण्याची परवानगी दिली नव्हती.

तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत मोबाईल हिसकावून घेतला होता. दरम्यान, याबाबत पोलिसांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, आमदार रघुराम कृष्ण राजू यांच्याकडून मेलद्वारे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार गुरुवारी सायंकाळी जगन मोहन रेड्डी यांच्यासह दोन पोलीस अधिकारी यांच्यास अजून दोण जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against former andhra pradesh cm jagan mohan reddy along with two ips officers gkt