सुपरमार्केटमध्ये कॅशिअरचे काम करणाऱ्या एका व्यक्तीने तब्बल १३०० ग्राहकांच्या कार्डचे डिटेल्स लक्षात ठेऊन त्याचा गैरफायदा घेत ऑनलाईन शॉपिंग करीत असल्याचे समोर आले आहे. जपानमधील टोकियो येथे हा प्रकार घडला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
यासुके तानिगुची असे या ३४ वर्षीय कॅशिअरचे नाव असून त्याच्यामध्ये फोटोग्राफिक मेमरी विकसित झालेली आहे. त्यामुळे एकदा पाहिल्यानंतर विविध कार्डच्या डिटेल्स त्याच्या मेंदूमध्ये सहज साठवल्या जातात. कुठल्याही अडचणीशिवाय कार्डचा १६ आकडी क्रमांक, नाव, त्याची एक्सपायरी डेट आणि सिक्युरिटी कोड लक्षात ठेवण्याची विलक्षण क्षमता त्याच्याकडे असल्याचे जपानी माध्यमांनी म्हटले आहे.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, यासुके हा टोकियोतील कोटो वॉर्ड येथील एका सुपरमार्केटमध्ये कॅशिअरचे काम करतो. तो खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या कार्डचे डिटेल्स ग्राहकांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे पाहून घ्यायचा आणि ते लक्षात ठेवत असंत. तसेच या डिटेल्सच्या माध्यमातून तो फुकटात ऑनलाइन शॉपिंगही करायचा.
मार्च महिन्यांत यासुकेने ऑनलाईन खरेदीद्वारे सुमारे २,७०,००० येन इतक्या किंमतीच्या दोन शोल्डर बॅगा खरेदी केल्या. मात्र, एकाच व्यक्तीकडून इतक्या मोठ्या रकमेची खरेदी केल्याने पोलिसांना संशय आला त्यामुळे त्यांनी या प्रकाराची चौकशी केल्यावर त्यांना आश्चर्यकारक माहिती कळली. ही खरेदी यासुकेने केल्याचे त्यांना समजल्यांतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली. यामध्ये तो ऑनलाईन खरेदीद्वारे लोकांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला फसवणूक प्रकरणी अटक केली.
यासुकेने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू तो स्थानिक तारण ठेवणाऱ्या पतपेढीकडे विकायचा आणि त्यातून मिळालेल्या पैशातून तो घराचे भाडे आणि घरगुती गरजेच्या वस्तू विकत घ्यायचा. पोलिसांनी यासुकेला अटक केल्यानंतर त्याच्या घरी छापेमारी केली असता त्यांना एक वही मिळाली यामध्ये त्यांना अनेक लोकांची नावे, नंबर आणि कार्ड डिटेल्स आढळून आली. हीच माहिती पोलिसांसाठी मोठा पुरावा ठरली.