पीटीआय, इस्लामाबाद : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड निश्चित झाली. त्यांच्या निवडीत भारताची कोणतीही भूमिका नसतानाही ते भारतीय वंशाचे असल्याचा भारतीयांना अभिमान वाटत आहे. मात्र आता यामध्ये पाकिस्तानचे नागरिकही सहभागी झाले आहेत. सुनक मूळचे पाकिस्तानचे असल्याचा दावा येथील समाजमाध्यमांवर करण्यात येत असून, नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. कारण सुनक यांच्या पैतृक घराण्यातील त्यांचे आजी-आजोबा ब्रिटिशकालीन भारतात जन्मले होते. त्यांचे जन्मस्थळ सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला हे आहे. त्यामुळे भावी ब्रिटिश पंतप्रधान पाकिस्तानचेही असल्याचा दावा करण्यात येत आहे. या संदर्भात पाकिस्तानकडून अद्याप कुठलेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.
सुनक यांच्या वंशाबाबत आतापर्यंत फार थोडा तपशील समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. मात्र, ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांत त्यांच्या पंतप्रधानपदी निवडीबाबात चर्चेला सुरुवात झाली आहे. ‘क्वीन लायनेस ८६’ नावाच्या ‘ट्विटर’ खातेधारकाने ‘ट्वीट’मध्ये म्हटले, की सुनक हे सध्याच्या पाकिस्तानातील गुजरांवाला येथील एका पंजाबी खत्री कुटुंबातील आहेत. ऋषी यांचे आजोबा रामदास सुनक यांनी १९३५ मध्ये नैरोबी येथे नोकरी मिळाल्याने गुजरांवाला सोडले. त्यांची पत्नी सुहागरानी १९३७ ला केनियाला जाण्यापूर्वी आपल्या सासूंसमवेत गुजरांवाला येथून दिल्लीला गेल्या. ऋषी यांचा जन्म १९८० मध्ये साऊथहॅम्प्टन (इंग्लंड) येथे झाला. मात्र, ४२ वर्षीय सुनक यांच्यासंदर्भात पाकिस्तानचे अधिकृत काहीही निवेदन नसले तरी समाजमाध्यमांवरील चर्चेत काही जणांनी पाकिस्तानच्या सरकारने सुनक हे मूळचे पाकिस्तानचे असल्याचा दावा करण्याची सूचना केली आहे. शफत शाह यांनी ‘ट्वीट’ केले, की पाकिस्तानने ऋषी सुनक हे मूळचे पाकिस्तानचे असल्याचा दावा केला पाहिजे. कारण त्यांचे आजी-आजोबा गुजरांवालाचे होते. ते तेथून केनिया आणि नंतर ब्रिटनला गेले. ‘ग्रँड फिनाले’ नावाच्या ‘ट्विटर’ खातेधारकाने लिहिले, की हे एक मोठे यश आहे. एक पाकिस्तानी आता ब्रिटनमधील सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे. तुमचा विश्वास असेल तर काहीही शक्य आहे.
परंतु इतर काही जणांनी सुचवले, की पाकिस्तान व भारत या दोन्ही देशांना नव्या ब्रिटिश नेत्याचा अभिमान वाटला पाहिजे. अमेरिकेतील याकूब बंगाशी यांनी ‘ट्वीट’ केले, की सकाळी गुजरांवाला येथील पंजाबी ब्रिटनचा पंतप्रधान होईल, या आशेने मी आता अमेरिकेत माझ्या घरी झोपायला जात आहे. सुनक यांच्या निवडीचा भारत आणि पाकिस्तान दोघांनाही संयुक्तपणे अभिमान वाटला पाहिजे. जट्ट नावाच्या नागरिकाने नमूद केले, की गुजरांवाला पाकिस्तानात असल्याने, शंभर वर्षांपूर्वी ज्यांचे वंशज या शहराचे रहिवासी होते ते आज पाकिस्तानी आहेत.
‘सुनक यांनी कोहिनूर पाकिस्तानला द्यावा!’
अख्तर सलीम या नागरिकाने ‘ट्वीट’ केले, की सुनक यांनी ‘कोहिनूर’ हा बहुमूल्य हिरा परत देण्यासंदर्भातील प्रलंबित मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. सुनक पंतप्रधान होणार आहेत. पाकिस्तानने त्यांच्याकडे लाहोरमधून चोरीस गेलेला कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी करावी.