कर्नाटकातील म्हैसूर येथील बसस्टॉपवर बसवलेले वादग्रस्त घुमट रविवारी एका रात्रीत काढून टाकण्यात आले आहेत. हे घुमट पाडण्याची धमकी भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांनी दिल्यानंतर आता ते नाहीसे झाले आहेत. या बसस्टॉपवर मध्यभागी एक मोठा आणि आजुबाजुला दोन लहान घुमट बसवण्यात आले होते. हे घुमट मशिदीसारखे दिसत असल्याचा दावा करत सिम्हा यांनी ते काढून टाकण्यासाठी अल्टिमेटम दिला होता.
याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकाऱ्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. “बसस्टॉपबाबत वाद नको. मी आत्तापर्यंत म्हैसुरमध्ये १२ बसस्टॉप बांधले आहेत. मात्र, या बसस्टॉपला जातीय रंग देण्यात आल्याने मी दुखावलो आहे. ज्येष्ठांच्या सल्लामसलतीनंतर मोठा घुमट कायम ठेवून आजुबाजुचे दोन घुमट काढून टाकले आहेत. लोकांनी याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. विकासाच्या दृष्टीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे”, असे स्पष्टीकरण घुमट हटवणाऱ्या रामदास यांनी दिलं आहे.
दरम्यान, बसस्टॉपवरील दोन्ही घुमट कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे आमदार तन्वीर यांनी दिला होता. घुमट काढल्यानंतर प्रताप सिम्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजुबाजूला लहान आणि मध्यभागी मोठा घुमट असेल तर त्या वास्तुला मशीद मानली जाते. त्यामुळे हे लहान घुमट काढून टाकल्याबाबत मी जिल्हाधिकारी आणि रामदास यांचे आभार मानतो”, असं ट्वीट प्रताप सिम्हा यांनी केलं आहे.