Uttar Pradesh Crime News : एका दलित समाजातील तरुणीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी अयोध्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीतून समोर आलेले तपशील पोलीस पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२२ वर्षीय तरुणी २७ जानेवारीपासून बेपत्ता होती. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र तक्रारीनंतरही पोलिसांनी योग्य तपास सुरू केला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनीच शोधमोहीम सुरू केली. पीडितेच्या गावापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या कालव्याजवळ शनिवारी तरुणीच्या मेव्हण्याला तिचा मृतदेह सापडला. तिच्या मृतदेहाची स्थिती पाहता तिची हत्या झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला. कारण, तिच्या शरीरावर खोलवर जखमेच्या खुणा होत्या. डोळेही काढून टाकण्यात आले होते, असा कुटुंबीयांनी दावा केला आहे. तरुणीच्या मृतदेहाची अवस्था पाहून तिची बहीण आणि इतर दोन महिला जागीच बेशुद्ध झाल्या होत्या, असे पीटीआयने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करूनही महिलेची शोधमोहीम तातडीने सुरू करण्यात आली नसल्याचं सांगत कुटुंबीयांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
संसद परिसरात निदर्शने
सोमवारी नगीना खासदार चंद्रशेखर आझाद यांनी या प्रकरणाच्या विरोधात संसदेतील बीआर आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने केली. आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) अध्यक्ष आझाद यांनी निष्क्रियतेबद्दल राज्य पोलिसांवर टीका केली.
“माझ्यासह संपूर्ण देशाला या घटनेचे दु:ख जाणवत आहे. कोणत्याही पालकांना आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून मारण्यात आलेल्या महिलेसारखी अवस्था बघायला आवडणार नाही. मला न्याय मिळताना दिसत नाही, ना पोलिसांकडून ना सरकारकडून”, असं आझाद म्हणाले.
…तर मी पदाचा राजीनामा देईन
“राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाच्या वेदना समजत नाहीत. त्यांना लोकांचा आवाज दाबायचा आहे आणि त्यांच्यावर हल्ले करायचे आहेत. उत्तर प्रदेशात महिला सुरक्षित नाहीत. जर पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास मी आपल्या पदाचा राजीनामा देईन”, असं रविवारी फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांनी सांगितले.