पाकिस्तानी लष्कराकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत असून, भारतीय सेना अशाप्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी समर्थ असल्याचे अरूण जेटली यांनी सांगितले. सीमाभागातील सुरक्षेची पाहणी करण्यासाठी संरक्षणमंत्री अरूण जेटली आजपासून जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात जेटली सीमारेषेवरील भागाची पाहणी करतील, तसेच येथील सुरक्षेशी संबधित राज्य सरकार आणि लष्करातील अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यावेळी संरक्षणमंत्र्यांना पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत विचारले असता, भारतीय सेना अशाप्रकारचे हल्ले परतवून लावण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी जम्मू-काश्मीर येथील पूँछ क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या पार्श्वभूमीवर अरूण जेटली यांचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत पाकिस्तानी लष्कराने २० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिल्ली येथील बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा व्यवस्थेविषयीचा प्रस्ताव उपस्थितांसमोर मांडला. या बैठकीला संरक्षणमंत्री अरूण जेटली, संरक्षण खात्याचे राज्यमंत्री  इंद्रजित सिंग आणि देशाचे सुरक्षा सल्लागार अजित दोवल उपस्थित होते.