पीटीआय, नवी दिल्ली
माजी ‘आयएएस’ प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी अपंगत्व दाखवण्यासाठी दोन प्रमाणपत्रे सादर केली. तपासणीत त्यातील एक प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितले. इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याचे लाभ फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने मिळविल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली असून, बुधवारी सुनावणीत पोलिसांनी त्यांचे एक प्रमाणपत्र बनावट असल्याचे न्यायालयाला सांगितले.
खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा-२०२२ आणि नागरी सेवा परीक्षा-२०२३ साठी दोन अपंगत्व प्रमाणपत्रे सादर केली. या प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर, अहमदनगर वैद्याकीय प्राधिकरणाने दावा केला आहे की शारीरिक अक्षमता, श्रवणदोष आणि कमी दृष्टी दर्शवणारे प्रमाणपत्र ‘सिव्हिल सर्जन ऑफिस रेकॉर्ड’नुसार जारी केलेले नाही. तसेच स्थिती अहवालानुसार हे प्रमाणपत्र बनावट असण्याची शक्यता जास्त आहे, असेही पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.