१५ ऑगस्ट रोजी काबूल पडल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा अंमल प्रस्थापित झाला. आता तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार देखील स्थापित झालं आहे. मात्र, यादरम्यान अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर अमेरिकी आणि इतर देशीय अडकलेल्या नागरिकांना विमानाने परत आणण्यात आलं आहे. नागरिकांना वाचवण्यासाठी राबवण्यात आलेली ही एअरलिफ्ट मोहीम यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळालं. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांना एअरलिफ्ट करण्याच्या मोहिमेमध्ये काहीच चूक होणार नाही, असं होणं शक्यच नाही. नुकत्याच घडलेल्या एका प्रकारामुळे ही गोष्ट अधोरेखितच झाली आहे.
हा प्रकार घडलाय फेसबुकने आर्थिक रसद पुरवून स्पॉन्सर केलेल्या काम एअरलाईन्सच्या विमानामध्ये! फेसबुककडून विमानातून एअरलिफ्ट करण्यासाठीच्या प्रवाशांची यादी तपासून काम एअरलाईन्सकडे सोपवली होती. त्यानुसार विमानात तेवढेच प्रवासी येणं अपेक्षित होतं. यामध्ये फेसबुकचे कर्मचारी, अमेरिकन नागरिक आणि इतर काही प्रवाशांची नावं होती. पण ३० ऑगस्ट रोजी जेव्हा हे विमान अबूधाबीमध्ये उतरलं, तेव्हा त्यात नियोजित प्रवाशांसोबतच किमांन १५५ अतिरिक्त प्रवासी असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
काबूल विमानतळावरून अमेरिकेसाठी उड्डाण घेणारी विमानं अबूधाबीमार्गे मेक्सिकोकडे जातात. त्यानुसार हे विमान अबूधाबीमध्ये उतरल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. नियोजित यादीनुसार प्रवासी चढल्यानंतर निम्म्या रिकाम्या विमानात १५५ अतिरिक्त प्रवासी भरण्यात आले. यामध्ये काम एअरलाईन्सचे कर्मचारी, त्यांचे नातेवाईक-कुटुंबीय आणि इतर नागरिकांचा समावेश होता.
सामान्यपणे एअरलिफ्ट करायच्या प्रवाशांचं रीतसर स्क्रीनिंग केलं जातं. त्यानंतरच त्यांना विमानात बसवून एअरलिफ्ट केलं जातं. मात्र, या विमानातील हे अतिरिक्त प्रवाशी विना स्क्रीनिंगच विमानात बसल्यामुळे गडबड उडाली. या सर्व प्रवाशांना अबूधाबीमध्ये उतरवून हे विमान उरलेल्या प्रवाशांसह मेक्सिकोच्या दिशेने रवाना झालं. मात्र, तरी देखील अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांसमोरचे प्रश्न सुटलेले नाहीत.
काम एअरलाईन्सचे कर्मचारी आणि शेवटच्या क्षणी या विमानात भरण्यात आलेले अतिरिक्त १५५ प्रवासी अजूनही यूएईमध्येच आहेत. इथे त्यांची देखील रीतसर यादी बनण्याच्या प्रतिक्षेत हे प्रवासी असून त्यांच्यासोबतच इतर देखील प्रवासी आहेत. अशा प्रवाशांची एकूण संख्या आता ३ हजार ६०० झाली आहे. यातले अनेक प्रवासी हे खासगी मार्गांनी अबुधाबीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांचं काय करायचं, यासाठीच्या निर्देशांची आता अबूधाबीतील अमेरिकन अधिकारी वाट पाहात आहेत.