JNU Professor Dismissed News : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) एका प्राध्यापकाने एका विदेशी महिला संशोधकाचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर संबंधित प्राध्यापकाला बडतर्फ करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. जेएनयू विद्यापीठात एका विभागात काम करणाऱ्या प्राध्यापकाच्या विरोधात महिला संशोधकाचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विद्यापीठ प्रशासनाकडून अधिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर संबंधित प्राध्यापकावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीने (आयसीसी) केली. यानंतर चौकशीमधून समोर आलेले निष्कर्ष बुधवारी जेएनयूच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आले. यानंतर संबंधित प्राध्यापक स्वरण सिंग यांना बडतर्फ करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, जेएनयूच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं की, प्राध्यापक स्वरण सिंग यांच्या बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच जपानी अधिकारी समन्वय साधण्यासाठी प्राध्यापकांशी नियमित संपर्कात होते. तसेच संबंधित विदेशी महिला संशोधकाने विद्यापीठाच्या आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. तसेच संभाषणांचे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहे”, असं म्हटलं आहे.
या बरोबरच विद्यापीठ प्रशासनाच्या परिषदेच्या बैठकीत आयसीसीने केलेल्या शिफारशींनुसार इतरही तीन प्राध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. यातील दोघांची प्रत्येकी तीन वर्ष वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच एका जणाला संवेदनशीलतेच्या संदर्भातील प्रशिक्षण घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे प्राध्यापक अनुक्रमे जेएनयूच्या सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीज, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस आणि संस्कृत विभागाशी संलग्न आहेत.
दरम्यान, विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी या प्रकरणाच्या संदर्भात बोलताना म्हटलं की, “हा निर्णय भ्रष्टाचार आणि लैंगिक गुन्ह्यांविरुद्ध प्रशासनाच्या सहनशीलतेच्या धोरणाचं प्रतिबिंब आहे. आता पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. जेएनयूची लोकशाही संस्कृती जपण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आता विद्यापीठ प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे की यापुढे विद्यार्थी प्रतिनिधी आयसीसीमध्ये निवडले जातील.