भारतात मॅगीमध्ये असलेल्या अपायकारक घटकांवरून उठलेल्या वादळानंतर आता अमेरिकेतदेखील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅलिफोर्नियातील वॅटस येथील ‘केएफसी’मध्ये एका ग्राहकाच्या ताटात चक्क तळलेला उंदीर आढळून आल्याचे दिसते आहे. खाद्यपर्थांच्या जागतिक बाजारपेठेत ‘केएफसी’ ही नावाजलेली कंपनी असून, भारतातदेखील गेल्या काही वर्षांत ‘केएफसी’ लोकप्रिय झाले आहे. डेवोरिस डिक्सन या ग्राहकाने फेसबुकवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये ताटात असलेल्या पदार्थाचा आकार तंतोतंत उंदरासारखा दिसत आहे. मात्र, या पदार्थावर ‘केएफसी’च्या विशिष्ट मसाल्याचे आवरण असल्याने हा उंदीरच आहे किंवा नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. परंतु, छायाचित्रात शेपटीचा भागदेखील स्पष्ट दिसत असल्याने हा उंदीरच असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आठवड्याभरापूर्वी ‘केएफसी’मध्ये गेले असताना हा प्रकार घडला असल्याचे डेवोरिस डिक्सन यांचे म्हणणे आहे. आपण ही गोष्ट तेथील व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यानेदेखील हा पदार्थ तळलेला उंदीर असल्याचे मान्य केले आणि आपली माफी मागितल्याचे डिक्सन यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, ‘केएफसी’कडून या सर्व प्रकाराचा इन्कार करण्यात आला आहे. आम्ही या सगळ्याची चौकशी करत असून ग्राहकांचे हित आमच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्दा असल्याचे केएफसीच्या फेसबुक पेजवर नमूद करण्यात आले आहे. आमच्याकडे विकण्यात येणाऱ्या चिकनच्या पदार्थांचा आकार आणि रंगरूप अनेकदा वेगवेगळे असते आणि अजूनपर्यंत डिक्सन यांनी दावा केल्याप्रमाणे तो पदार्थ उंदीरच असल्याचे स्पष्ट झालेले नाही. आम्ही सध्या डिक्सन यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, ते आमच्याशी सहकार्य करण्यास तयार नसल्याचे केएफसीचे म्हणणे आहे. याशिवाय, डिक्सन यांनी आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणात कितपत तथ्य आहे, याबाबत अद्यापही साशंकता आहे.

1795646_957544504311682_636