दिल्ली न्यायालयाने सात वर्षांनंतर बलात्काराच्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पीडितेवर तिच्या नातेवाईकानंतर काही अनोळखी लोकांनी बलात्कार केला होता. पीडितेवर जेव्हा अमानुष अत्याचार करण्यात आले तेव्हा ती अल्पवयीन होती. नातेवाईकाने अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीने काही अनोळखी लोकांकडे मदत मागितली असता त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराची घटना झाली तेव्हा पीडितेने नवरात्रीचा उपवास ठेवला होता.

टाइम्स ऑप इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 7 एप्रिल 2011 ची ही घटना आहे. उत्तर प्रदेशची रहिवासी असणारी तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत फरीदाबाद येथे राहत होती. बलात्कार झाला त्यादिवशी आरोपी आपल्या पत्नीसोबत पीडितेच्या घरी आला होता. आरोपीने पीडितेच्या कुटुंबीयांना कंपनीतील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत, मात्र त्यासाठी आपल्या मुलीला सोबत आणण्याची अट ठेवण्यात आली आहे अशी खोटी बतावणी केली. आरोपीने पीडितेला आपली मुलगी म्हणून सोबत नेण्यासाठी तिच्या आई-वडिलांकडे परवानगी मागितली.

आरोपीने संध्याकाळी मुलीला घरी सोडतो असं आश्वासन तिच्या पालकांना दिलं होतं. पण आरोपी पीडितेला कंपनीत नेण्याऐवजी आपल्या घरी घेऊन गेला. आरोपीच्या पत्नीला फरीदाबाद येथे डॉक्टरकडे जायचं असल्या कारणाने ती आई-वडिलांकडे निघून गेली होती. पीडितेला घरी ठेवून आरोपी कंपनीत निघून गेला आणि काही भेटवस्तू घेऊन परत आला. पीडितेला घऱी सोडण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा आरोपी आजारी असल्याचं नाटक करु लागला. त्यावेळी पीडित तरुणी एकटीच घरी होती. आरोपीने मुलीला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तरुणीने तेथून पळ काढला होता.

बिजेंद्र नावाच्या एका व्यक्तीने मदत करण्याच्या नावाने पीडितेला लिफ्ट दिली. यानंतर परवीन आणि विनोद असं दोघंजण कारमध्ये शिरले. तिघांनी मिळून पीडितेला मारहाण केली आणि आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एका व्यक्तीने पीडितेचा आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. न्यायालयाने आरोपींना जन्मठेप आणि साडे चार लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने पीडितेला पाच लाखांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

Story img Loader