दिल्लीतील आयआयटी संस्थेच्या वसतिगृहाकडून देण्यात आलेला आदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुलींसाठी असलेल्या या वसतिगृहाच्या प्रशासनाकडून संस्थेतील वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. या आदेशात मुलींनी कार्यक्रमाला येताना संपूर्ण अंग झाकणारे पाश्चात्य किंवा भारतीय कपडे घालावेत, असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे आता यावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्ली आयआयटीतील मुलींची संख्या हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या पार्श्वभूमीवर वसतिगृहाच्या मुलींवर बंधने टाकणाऱ्या आदेशामुळे अनेक नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. अखेर हे प्रकरण अंगलट येऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर वसतिगृह प्रशासनाकडून हे आदेश मागे घेण्यात आले आहेत.
देशातील आयआयटीमध्ये शिकणाऱ्या स्नातकांपैकी केवळ ८ टक्के महिला आहेत. अधिकाधिक महिलांनी आयआयटीमध्ये प्रवेश घ्यावा, यासाठी नियमांमध्ये बदलही करण्यात आले आहेत. ज्यामध्ये महिलांसाठी १४ टक्के राखीव जागांची निर्मिती करण्यात आली. याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल. याचा महिलांना फायदा होणारच आहे. पण याबरोबरच महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि त्यांनी आयआयटी प्रवेश घेतल्यावर काय घालावे, यावरील बंधन हटवली गेली तर ते जास्त उपयुक्त ठरेल.
A IIT-Delhi girls' hostel has asked its residents to wear 'full covered decent western or Indian dresses' on the House day. pic.twitter.com/cEGfBtmebW
— ANI (@ANI_news) April 18, 2017
Hostel warden at #IITDelhi issues circular asking girls to wear 'full clothes', sparks row; prompts administration to order its removal.
— Press Trust of India (@PTI_News) April 18, 2017
यापूर्वी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी हॉस्टेलमधील मुलींच्या सुरक्षेसाठी त्यांच्यावर लवकर येण्याचा ‘कर्फ्यू’ लावावा, असे मत मांडले होते. साधारणत: १६ किंवा १७ व्या वर्षी तरूण मुले आणि मुली शरीरातील हार्मोनल बदलांना सामोरे जातात. त्यामुळे या वयातील भावनिक आवेगापासून मुलींना जपायचे असेल तर त्यांच्यावर काही बंधने घातली पाहिजेत. ही गोष्ट मुलींच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे. महाविद्यालयात केवळ सुरक्षारक्षक तैनात करून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी मुलींवर विशिष्ट बंधने घालून हा प्रश्न सोडवता येईल का, या दृष्टीकोनातून विचार झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी वाचनालयात जाऊन अभ्यास करायचा असेल तर त्यावेळी मुलांना आणि मुलींना वेगळे बसवले पाहिजे. अशावेळी वाचनालयात दोन रात्री मुलांना आणि दोन रात्री मुलींसाठी राखून ठेवल्या पाहिजेत, असे मेनका गांधी यांनी म्हटले होते. तसेच मुलांवरही काही बंधने घातली पाहिजेत. मुलांना महाविद्यालयाच्या परिसरात संध्याकाळी सहानंतर फिरण्यावर निर्बंध घातले पाहिजेत, असेही मेनका गांधी यांनी सांगितले होते.