कॅलिफॉर्नियातील सॅन फ्रान्सिस्को शहरात असलेल्या भारतीय दूतावासावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रविवारी हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे खलिस्तानी समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेवर अमेरिकेनं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रविवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर दूतावासाला आग लागली. पण, याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीत दूतावासाचे मोठं नुकसान झालं नाही. या हल्ल्यात दुतावासातील कोणताही कर्मचारी जखमी झाला नाही.
हेही वाचा : VIDEO : “…तर याला काय अर्थ”, समान नागरी कायद्याबाबत भाजपा खासदार महेश जेठमलानी यांचं वक्तव्य
याप्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे. “शनिवारी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात झालेल्या तोडफोडीचा आणि जाळपोळीचा प्रयत्न करण्यात आला. याचा अमेरिका तीव्र निषेध व्यक्त करते. अमेरिकेत असलेल्या विदेशी दूतावासाची तोडफोड आणि हिंसाचार हा गुन्हा आहे,” मॅथ्यू मिलर यांनी सांगितलं.
हेही वाचा : समान नागरी कायद्याची घाई नको!, संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांची भूमिका
दरम्यान, यापूर्वी मार्च महिन्यात खलिस्तानी समर्थकांच्या एका गटाने सॅन फ्रान्सिस्कोमधीलच भारतीय दूतावासावर हल्ला केला होता. यानंतर अमेरिका आणि भारत सरकारने याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता. तसेच, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी भारताकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता रविवारी पुन्हा भारतीय दूतावासावर हल्ल्याची दुसरी घटना घडली आहे.