अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या नेपाळ या छोट्याशा देशात अनेक प्राचीन हिंदू मंदिरे देखील आहे. ही मंदिरे पाहण्यासाठी, त्यांची कलात्मकता, प्राचीन इतिहास डोळ्यात साठवण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक दूरून नेपाळमध्ये येतात. मात्र २०१५ साली झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे नेपाळचा चेहरामोहरा बदलला. जवळपास साडे आठ हजार लोकांचे बळी या भूकंपात गेले. अनेक प्राचीन मंदिरांचं मोठं नुकसान झालं. भूकंपामुळे नेपाळमधील १७ व्या शतकातील कृष्णमंदिरांचेही मोठं नुकसान झालं.
भूकंपानंतर या मंदिराचे द्वार भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. या काळात मंदिराच्या बांधकामाचं काम हाती घेण्यात आले. अखेर भूकंपानंतर तीन वर्षांनी मंदिरांचे द्वार गोकुळाष्टमीनिमित्त भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. दरवर्षी गोकुळाष्टमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी ललितपुरमधल्या कृष्णमंदिरात जमते. सिद्धि नरसिंह मल्ल यांनी १७ व्या शतकात हे मंदिर बांधलं. भारतीय शिखर शैलीत हे मंदिर बांधलं गेलं आहे.
#Nepal: A Krishna temple in Lalitpur that was damaged by the earthquake in the year 2015 reopens after 3 years on the occasion of #Janmashtami. (02.09.2018) pic.twitter.com/SEpm8buA7f
— ANI (@ANI) September 3, 2018
तीन मजली कृष्ण मंदिराच्या पहिल्या मजल्यावर महाभारतातील काही प्रसंग कोरले आहेत. तर दुसऱ्या मजल्यावर रामायणातील काही प्रसंग कोरण्यात आले आहेत. या मंदिराभोवती एक कथा गुंफली आहे. असं म्हणतात, राजा मल्ल यांना भगवान कृष्ण आणि राधानं स्वप्नात दर्शन देऊन त्याच्याच महलपरिसरात कृष्ण मंदिर बांधण्यास सांगितलं होतं. या आदेशाचं पालन करत मल्लनं हे कृष्ण मंदिर बांधलं. एप्रिल २०१५ मध्ये नेपाळला ७.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. यात ललितपुरच्या मंदिराचंही मोठं नुकसान झालं. अखेर तीन वर्षांनी मंदिरांचं दार भाविकांसाठी खुले करण्यात आल्यानं भाविकांची मोठी रिघ श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात जमली आहे.