बंगळुरुत प्लास्टिक पिशवीत एका ६७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी आठवड्याभरानंतर हत्येचा उलगडा केला आहे. मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचा प्रेयसीसह सेक्स करताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. यानंतर प्रेयसीने आपल्या पती आणि भावाच्या सहाय्याने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय व्यवसायिकाचे घरातील ३५ वर्षीय मोलकरणीशी प्रेमसंबंध होते. पीडित व्यक्ती १६ नोव्हेंबरला तिच्या घऱी गेली होती. सेक्स करताना तिच्याच घरात बेडवर त्याचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.
बाला सुब्रहमण्यम असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. १६ नोव्हेंबरला दुपारी ५ वाजता ते आपल्या नातवाला बॅडमिंटनच्या क्लासमध्ये सोडण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांनी आपल्या सुनेला फोन करुन एक महत्त्वाचं काम असल्याने घरी येण्यास उशीर होईल असं सांगितलं होतं.
बराच वेळ झाला तरी बाला सुब्रहमण्यम घरी आले नसल्याने मुलाने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली. बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना प्लास्टिक आणि बेडशीटमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह सापडला होता.
समाजात बदनामीची भीती
बाला यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रेयसीने समाजात बदनामी होईल या भीतीने आपल्या पती आणि भावाला फोन केला होता. यानंतर पतीसह तिने मृतदेह एका प्लास्टिक पिशवीत भरला आणि एका निर्जनस्थळी फेकून दिला.
चौकशी केली असता महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस आपल्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करतील अशी भीती असल्याने महिलेने पती आणि भावाच्या मदतीने मृतदेह रस्त्यावर फेकून दिला होता.
बाला यांचे मोलकरणीशी गेल्या अनेक काळापासून संबंध असल्याचं उघड झालं आहे. ते अनेकदा तिच्या घरी जात होते. गतवर्षी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेने दिलेली माहिती पडताळून पाहत आहेत.