एकदा आपण वयात आलो की एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो तो म्हणजे लग्न कधी करणार?. शेजारी, नातेवाईक, मित्र सगळीकडून या एका प्रश्नाचा नुसता भडीमार होत असतो. लग्न करणे ही आपली खासगी बाब असल्याने अनेकांना या प्रश्नामुळे सतत राग येत असतो. पण अनेकदा या प्रश्नाची सवय झाली असल्याने अनेकजण दुर्लक्ष करणे हाच उत्तम उपाय असल्याचं ठरवतात. पण इंडोनेशियात या प्रश्नाला कंटाळून तरुणाने शेजारी राहणाऱ्या महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
लग्न कधी करणार अशी विचारणा वारंवार करत असल्याने २८ वर्षीय तरुणाने शेजारी राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, महिला आरोपीच्या घऱी गेली असता लवकरात लवकर लग्न कर असा सल्ला दिला होता. यामुळे आरोपी नाराज झाला होता.
अशी विचारणा केल्याने आपला अपमान झाल्याचं तरुणाला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी त्याने महिलेचं घर गाठलं आणि बेडरुममध्ये जाऊन गळा दाबून तिची हत्या केली. महिलेने स्वरक्षणासाठी आरोपीच्या बोटांचा चावा घेतला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.
आरोपीने हत्या केल्यानंतर महिलेचा स्मार्टफोन आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला होता. पण पोलिसांनी त्याचा माग काढत अटक केली आहे. त्याच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.