१३ वर्षाच्या मुलीला ब्लॅकमेल करत इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी जबरदस्ती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात धर्मांतरविरोधी कायदा आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आपल्याकडील काही फोटोंच्या सहाय्याने आरोपी पीडित मुलीला ब्लॅकमेल करत होता.
युनूस पाशा उर्फ मोहम्मद असं आरोपीचं नाव आहे. पीडित मुलगी हिंदू असून त्याच परिसरात राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला स्मार्टफोन विकत घेऊन दिला होता. यानंतर दोघेही व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बोलत होते. मुलीच्या कुटुंबाला मोबाईल फोनबद्दल काहीच माहिती नव्हतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने व्हिडीओ कॉलदरम्यान मोबाईलमध्ये पीडित तरुणीचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते. या फोटोंच्या माध्यमातून आरोपी शारिरीक संबंध ठेवण्यासाठी तरुणीवर दबाव टाकत होता. जेव्हा तरुणीने नकार दिला तेव्हा त्याने आपलं चॅट आणि फोटो कुटुंबाला पाठवण्याची धमकी दिली.
८ नोव्हेंबरला मुलीचं कुटुंब शिर्डीला गेलं होतं. मुलगी घऱी आजीसह एकटी होती. आरोपीने याचाच फायदा घेतला. १० नोव्हेंबरला आरोपीने मुलीच्या आजीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला.
मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, १२ नोव्हेंबरला घरी परतलो तेव्हा मुलीच्या वागण्यात काही बदल जाणवत होते.
बलात्कार केल्यानंतर आरोपी युनूसने इस्लाम धर्म स्वीकारला तर लग्न करु अशी अट ठेवली. यानंतर १८ नोव्हेंबरला मुलीने आपल्या कुटुंबाला सगळी घटना सांगितली. दुसऱ्याच दिवशी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी युनूसचं लग्न झालेलं असून, त्याला एक मूल असल्याचं समोर आलं आहे.