लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीची प्रियकारने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी ओडिशामधील भुवनेश्वर येथील रहिवासी आहे. आरोपीने प्रेयसीला गुजरातला नेऊन तिथे तिची हत्या केली. प्रेयसी सतत लग्न करण्याची मागणी करत असल्यानेच आरोपीने हत्या केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.
जगन्नाथ गोडा असं या आरोपीचं नाव आहे. आरोपीने प्रेयसीपासून आपली सुटका करुन घेण्यासाठी तिच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने तिला आपल्यासह सूरतला येण्यास सांगितलं होतं.
जगन्नाथने आपण शहर पाहूयात सांगत प्रेयसीला घटनास्थळी नेलं होतं. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याने तिला ४९ वेळा भोसकलं. जोपर्यंत तिचा मृत्यू होत नाही तोपर्यंत तो वार करत होता. यानंतर एका निर्जनस्थळी मृतदेह फेकून देत त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.
मृतदेह सापडल्यानंतर सूरत पोलिसांनी तपास सुरु केला होता. यावेळी टी-शर्टमुळे पोलिसांच्या हाती मोठा सुगावा लागला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले तसंच बस आणि रेल्वे स्थानकांवर चौकशी केली. यानंतर पोलीस आरोपी जगन्नाथपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. दरम्यान यामध्ये अजून कोण सहभागी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.