पीटीआय, नवी दिल्ली
मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समाजांबरोबर लवकरच चर्चा करेल व त्यांच्यातील वांशिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. मणिपूरमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर सोमवारी येथे झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
वर्षभरापेक्षा अधिक काळ मणिपूरमध्ये दोन समाजांमध्ये प्रचंड हिंसाचार होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल अनुसूया उइके यांनी शहा यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह, पोलीस महासंचालक राजीव सिंह, राज्याचे मुख्य सचिव विनित जोशी यांच्याबरोबर शहा यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर मोदी सरकार मणिपूरमध्ये दीर्घकालीन शांततेसाठी कटिबद्ध असल्याचे शहा यांनी सांगितले. गरज पडल्यास धोरणात्मक पद्धतीने केंद्रीय पथके मणिपूरमध्ये तैनात करण्यात येतील, असे संकेतही त्यांनी दिले.
हेही वाचा >>>‘मतपेढीच्या राजकारणाचा तुष्टीकरणाशी संबंध’; एनसीईआरटीच्या ११वी राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातील प्रकरणांत बदलांमुळे वाद
मुख्यमंत्री अनुपस्थित
या महत्त्वाच्या मुद्द्यावर सुमारे तासभर चाललेल्या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक तपन डेका, लष्करप्रमुख जन. मनोज पांडे, भावी लष्करप्रमुख लेफ्ट. जन. उपेंद्र द्विवेदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह मात्र बैठकीत हजर नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.