सध्या निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या स्तुतिसुमनांचा वर्षांव आणि त्यानंतर प्रत्युत्तरादाखल क्लिंटन यांनी ओबामा यांचे केलेले कौतुक, अशा ‘कौतुक सोहळ्या’नेच अमेरिकेच्या खासगी वृत्तवाहिनीवरील तासभराचा कार्यक्रम गाजला़
‘मला क्लिंटन यांची आठवण येत राहील,’ अशा शब्दांत ओबामा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़ क्लिंटन यांनी चार वर्षांच्या धकाधकीच्या कार्यकाळात देशोदेशी केलेल्या अविरत दौऱ्याचा या वेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला़ ‘माझ्या प्रशासनामध्ये क्लिंटन यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी राष्ट्राने त्यांचे कौतुक करावे,’ अशी इच्छाही त्यांनी या वेळी व्यक्त केली़ सार्वजनिकरित्या क्लिंटन यांचे आभार मानण्यासाठीच आपण खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात गेल्याचे ओबामा यांनी सांगितल़े
ओबामा यांनी केलेल्या या कौतुकाला उत्तर देताना, क्लिंटन यांनी आपले ओबामा यांच्याशी अत्यंत जवळचे आणि सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे सांगितल़े तसेच शब्दांची आवश्यकता भासणार नाही इतका समजूतदारपण आमच्या नात्यात होता, असेही त्या म्हणाल्या़.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा