पीटीआय, नवी दिल्ली
चीनमधील बालकांमध्ये ‘एच९एन२’ (एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस) आणि श्वसनविकार यांचा उद्रेक झाला असल्याने करोनासारखाच या आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या आजारांचा भारताला धोका कमी असून केंद्र सरकारचे याकडे बारकाईने लक्ष असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. या आजारांमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यास लढा देण्यास तयार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
चीनच्या उत्तर भागांत काही बालकांना ‘एच९एन२’ आणि श्वसनविकार यांचा प्रादुर्भाव झाला असून या आजारांचा मोठय़ा प्रमाणात प्रसार होत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत निवेदन जारी केले आहे. चीनमध्ये गेल्या महिन्यात ‘एच९एन२’चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्यानंतर हा संसर्ग वाढत गेला. या आजाराविरोधात लढण्यासाठी चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला आहे. ‘एच९एन२’च्या संसर्गाचा प्रसार वेगाने होत नसून मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे आढळले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >>>संजय राऊतांच्या हिटलर संदर्भातील पोस्टचा इस्रायलकडून कठोर शब्दांत निषेध; या प्रकरणी राऊतांची प्रतिक्रिया…
‘डब्ल्यूएचओ’ची निरीक्षणे..
जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांगितले की, चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी बालकांमध्ये ‘एच९एन२’, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा फ्लूच्या वाढत्या प्रकरणांसह अनेक संसर्गजन्य श्वसनरोगांची नोंद केल्यानंतर या आजारांच्या वाढीबद्दल तपशीलवार माहिती चीनकडे मागितली आहे.
‘डब्ल्यूएचओ’ने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या ‘एच९एन२’च्या प्रकरणांमध्ये एका मानवाकडून दुसऱ्या मानवाकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी आहे. त्याशिवाय या आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी आहे.
या श्वसनविकारांत नवे विषाणू नाहीत -चीन
बीजिंग : चीनमधील बालकांमध्ये आढळलेल्या नव्या श्वसनविकारांत कोणतेही नवे विषाणू आढळले नाहीत, असा दावा चीनने केला आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा फ्लूच्या वाढत्या प्रकरणांमुळे घाबरण्याची गरज नसून ही जागतिक चिंता नसल्याचे चीनकडून सांगण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडे नव्या आजारांबाबत माहिती आणि आकडेवारी मागितल्यानंतर चीनने ही माहिती दिली.