जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा जवानांनी उधळून लावला. भूसुरुंग स्फोटामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून एकाला ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याला याआधीही नियंत्रण रेषा पार केल्यामुळे अटक करण्यात आली होती. पण माणुसकीच्या नात्याने त्याला पुन्हा परत पाठवण्यात आलं होतं. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्याने त्याला ३० हजार रुपये (पाकिस्तानी चलन) रुपये दिले होते असंही लष्कराने सांगितलं आहे.
लष्कराच्या माहितीनुसार, २१ ऑगस्टला नौशेरामधील झांगर येथे काही जवानांना दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यामधील एक घुसखोर भारतीय चौकीच्या जवळ होता आणि भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जवानांनी गोळीबार सुरु केला आणि यामध्ये तो जखमी झाला. त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
यामधील दोन घुसखोर मात्र पाकिस्तानव्याप्त प्रदेशात पळून जाण्यात यशस्वी ठरले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार “दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं असून तो जखमी आहे. त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली असून, सर्जरीही केल्यामुळे त्याचा जीव वाचला”.
पाहा व्हिडीओ –
तबरक हुसैन असं या दहशतवाद्याचं नाव आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्याचा तो रहिवासी आहे. चौकशीदरम्यान त्याने आपल्याला पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेमधील कर्नल युनूस चौधरी याने पाठवल्याचं सांगितलं असल्याचं लष्कराने म्हटलं आहे. कर्नलने दिलेले ३० हजार रुपये त्याच्यासोबत होते अशी माहितीही लष्कराने दिली आहे.