Doctor Attacked in Andhra Pradesh : कोलकाता येथील आर.जी.कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशातमधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच डॉक्टर्स रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर कडक कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर एका रुग्णाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तिरुपती येथील व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयातील ही हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक रुग्ण महिला डॉक्टरला तिच्या केसांना पकडून रुग्णालयातील बेडला असलेल्या स्टीलच्या पट्टीवर तिचे डोके आपटताना दिसत आहे. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
हेही वाचा : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधातील आंदोलन चिघळले, पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
तिरुपती येथील व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयामध्ये एका रुग्णाने अचानक एका महिला डॉक्टरवर हल्ला केला. त्यामुळे रुग्णालयातील बाकीचे रूग्णही घाबरून गेले. मात्र, या हल्ल्यानंतर रुग्णालयातील अलार्म वाजल्यामुळे वॉर्डातील इतर डॉक्टर आणि सहकारी मदतीला धावले आणि त्यांनी हल्लेखोर रुग्णाला पकडले. या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरक्षेची मागणी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
महिला डॉक्टराने संचालकांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?
व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात घडलेल्या या घटनेनंतर संचालक डॉ. आर व्ही कुमार यांना लिहिलेल्या पत्रात महिला डॉक्टराने सांगितलं की, शनिवारी आपत्कालीन विभागात कर्तव्यावर होती. याचवेळी एका रुग्णाने अचानक हल्ला केला. त्यानंतर वॉर्डात उपस्थित असलेले इतर डॉक्टर तातडीने त्यांच्या सहकाऱ्याच्या मदतीसाठी धावले आणि त्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. तसेच यावेळी महिला डॉक्टरांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.