माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल आपल्या मनात कोणताही वैयक्तिक आकस नाही, मात्र सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनाच सरकारवरील प्रशंसा आणि टीका स्वीकारावी लागते, असे भारताचे माजी महालेखापाल विनोद राय यांनी म्हटले आहे.
यूपीए सरकारच्या राजवटीत झालेल्या अनेक घोटाळ्यांबाबत डॉ. मनमोहन सिंग यांनी कोणतीही कारवाई केली नाही, अशी टीका विनोद राय यांनी केल्याने काँग्रेसच्या नेत्यांकडून त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. तर अन्य राजकीय पक्षांनी राय यांच्या विधानांचा आधार घेऊन यूपीएवर टीका केली. काही गैरव्यवहार निदर्शनास येताच डॉ. सिंग यांनी कोळशाच्या खाणींचा लिलाव करण्याचे आदेश दिले त्याचे श्रेय त्यांना द्यावयासच हवे, असे राय यांनी म्हटले आहे. पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात, त्यांचा निर्णयप्रक्रियेत कदाचित सहभाग नसेल, राष्ट्रकुल घोटाळ्याला ते प्रत्यक्ष जबाबदार नाहीत, असेही राय यांनी म्हटले आहे.
तथापि, सरकारचे प्रमुख या नात्याने प्रशंसा आणि दोष पंतप्रधानांनाच स्वीकारावा लागतो. त्यामुळे आपण वक्तव्य केले त्यांच्याविरुद्ध वैयक्तिक आकस आपल्या मनात नाही, असेही राय यांनी स्पष्ट केले.

Story img Loader