पीटीआय, जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाजवळ पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एका गुंडाने गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस अधिकारी जखमी झालेत. यातील एका जखमी अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. या चकमकीत गुंडालाही ठार करण्यात आले आहे.दरम्यान, लेफ्टनंट राज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी पोलीस उपनिरीक्षक दीपक शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. आमच्या शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल आणि आम्ही भयमुक्त जम्मू-काश्मीर निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले.
खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी गुंड वासुदेव एका ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी त्याचा पाठलाग करताना चकमक झाली. यावेळी गुंड वासुदेव याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी दीपक शर्मा यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर ४० वर्षीय विशेष पोलीस अधिकारी अनिल कुमार यांनाही दुखापत झाली आहे. त्यांना कठुआ येथील जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शर्मा यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कठुआ येथील जीएमसी रुग्णालयात नेण्यात आला आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, या चकमकीत वासुदेव ठार झाला तर त्याचा एक सहकारी जखमी झाला. वासुदेव हा कुख्यात शुनू गटाचा म्होरक्या होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.