ब्रिटनची सध्याची अवस्था फारच बिकट आहे. देशाला आर्थिक मंदीचा फटका बसला असून येथील महागाईने आकाशाला हात टेकले आहेत. अशा परिस्थितीत नव्यानेच पंतप्रधान झालेल्या ऋषी सुनक यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. असे असतानाही पंतप्रधानांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. नुकतंच पंतप्रधान सुनक लंडनच्या ट्यूब स्टेशनवर पॉपीज म्हणजेच एक प्रकारची फुलं विकताना दिसले. देशाच्या पंतप्रधानाला असे करताना पाहून नागरिकही हैराण झाले आहेत.
कागदापासून बनवण्यात आलेले हे पॉपीज सुनक पाच पाउंड या किमतीला विकत होते. रॉयल ब्रिटिश लीजनच्या वार्षिक लंडन पोपी डेसाठी हा निधी उभारण्यात आला होता. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, घरोघरी जाऊन लोकांकडे देणग्या मागणाऱ्या ब्रिटीश आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्या स्वयंसेवकांचा भाग बनले होते.
अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावल्यामुळे पंतप्रधानांना सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अनेकांनी त्यांच्याबरोबर सेल्फी काढली तसेच त्यांच्याबरोबर गप्पाही मारल्या. यानंतर काहीजणांनी यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्यांनी पंतप्रधानांबरोबर गप्पा मारण्याचा अनुभव सांगितला. अनेकांना सुनक यांची ही कृती खूपच आवडली.
कारला टेकून उभा राहिल्याने सहा वर्षाच्या मुलाच्या पेकटात घातली लाथ, नेटकऱ्यांचा संताप; Video Viral
रॉयल ब्रिटिश लीजनच्या वतीने पीएम सुनक यांचे आभार मानले गेले. सर्वोच्च नेत्याने गर्दीच्या वेळी येऊन या उदात्त प्रयत्नासाठी वेळ देणे हे कौतुकास्पद काम असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर ब्रिटनचे पंतप्रधान सर्वसामान्यांमध्ये मिसळल्याने लोकांनीही आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे याबाबत माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. सुनक यांच्याकडून पॉपीज विकत घेणारा लुईस म्हणाला की आमचे पंतप्रधान खूपच विनम्र आहेत.