पुरातत्व विभागाने सध्या एका उत्खननाची तयारी सुरू केली आहे. उद्देश आहे एकोणीसाव्या शतकातील १००० टन सोन्याचा खजिना बाहेर काढणे. त्याचे झाले असे की उत्तर प्रदेशमधील एका साधूंच्या स्वप्नामध्ये एकोणीसाव्या शतकातील १००० टन सोन्याचा खजिना आला. या साधू महाराजांनी तातडीने एका केंद्रीय मत्र्यांना गाठले व हा खजिना बाहेर काढण्यासाठी पुरातत्व खात्याकडून उत्खनन करण्याची गळ घातली. या खजिन्यातून देशाची आर्थिक परिस्थिती काही प्रमाणामध्ये सुधारण्यास मदत होईल, असा सल्लादेखील दिला.
हे साधू महाराज आहेत शोभना सरकार. या साधूंच्या स्वप्नामध्ये १८५७ च्या उठावा दरम्यान इंग्रजांशी लढताना शहिद झालेले उत्तर प्रदेशमधील उन्नाओ जिल्ह्यातील दौंडीया खेडाचे महाराज राजारावरामबक्ष सिंग आले. स्वप्नामध्ये महाराज बक्ष सिंग यांनी साधूबाबांना खजिन्याबद्दल माहिती सांगून, त्या खजिन्याचा ताबा घेण्यास सांगितल्याचा दावा शोभना सरकार यांनी केला आहे.
स्थानिक भागात अनेक भक्तगणांचा गोतावळा शोभना सरकार यांच्या भोवती जमा होतो. सरकार यांनी त्यांना पडलेल्या स्वप्नाबद्दल स्थानिक प्रशासनाला, उत्तर प्रदेश सरकारला व केंद्र सरकारलादेखील कळवले आहे.
“सर्वांनी सुरूवातीला साधू शोभना सरकार यांच्या स्वप्नाला हसण्यावारी घेतले होते. शोभना सरकारदेखील शासन वेगवेगळ्या मंदिरांकडे असणाऱ्या सोन्याचा ताबा घेणार असल्याच्या समजुतीने घाबरले होते. त्या नंतर त्यांनी मला राजारावरामबक्ष सिंग यांच्या किल्ल्यामध्ये १००० टन सोन्याचा खजिना दडला असल्याचे शासनाला कळवण्यास सांगितले होते,” असे शोभना सरकार यांच्या एका भक्ताने सांगितले.                  
“आम्ही खूप भाग्यवान आहोत. केंद्रीय कृषी आणि अन्न प्रक्रिया राज्य मंत्री डॉ. चरणदास महंत यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना ते पटले देखील. त्यानंतर भारतीय भूशास्त्रीय सर्वेक्षण विभाग व पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा एक गट यावर काम करत आहे,” असे सरकार यांचा भक्त पुढे म्हणाला.
छत्तीसगडमधून लोकसभेवर निवडून आलेले चरणदास महंत यांनी २२ सप्टेंबर व ७ ऑक्टोबरला दौंडीया खेडा भागाचा दौरा करून पाहणी केली.