सौदी अरेबियामध्ये महिलांना अत्यंत हीन वागणूक मिळते, तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य मिळत नाही असा आरोप या देशातून पळालेल्या तरुणीनं केला आहे. मूळची सौदी अरेबियाची असलेल्या आणि कुवेतमधून पळून गेलेल्या १८ वर्षाच्या तरुणीला बँकॉक विमानतळावर अडवण्यात आले. राहफ मोहम्मद अल-क्यूनून असे तिचे नाव आहे. विमानतळावरील अधिकारी तिला तिच्या कुटुंबियांकडे परत पाठवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आपल्याला परत जायचे नाही असे सांगत मला मदत करा असे आवाहन केले होते. अशापद्धतीने पळून येण्याबद्दल तिने एका आंतरराष्ट्रीय चॅनेलला मुलाखत दिली आहे.
ती म्हणते,”मला स्वतंत्रपणे जगायचे होते. ताण आणि अत्याचार यांपासून मला मुक्तता हवी होती. मला हव्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य मला मिळत नव्हते, तसेच परवानगीशिवाय मला नोकरी करण्याची मुभा नव्हती,” अशी खंत व्यक्त करतानाच आपल्याबद्दल माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या पाहून आपण खिन्न झाल्याचे तिने या मुलाखतीत म्हटले आहे. माझे कुटुंब मला नाकारेल कसे? असा प्रश्नही तिने उपस्थित केला. “सौदी अरेबियामधील व्यवस्थापनाने महिलांचे आयुष्य, नोकरी आणि त्यांचे स्थान यावर नियंत्रण ठेवतात. याठिकाणी महिला आपल्या आपण प्रवासही करु शकत नाहीत. याठिकाणी महिला ५० ते ६० वर्षांच्या असतील तरीही त्यांना लहान मुलांसारखी वागणूक दिली जाते. महिलांना अतिशय वाईट वागणूक दिली जाते. पुरुषांइतक्या स्वतंत्र किंवा समान नाहीत,” अशी व्यथा तिनं मांडली आहे.
राहफ म्हणते ”याच कारणामुळे सौदी अरेबियातून पळून जाणाऱ्या महिलांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. येथील व्यवस्थापनाला कंटाळून या महिला पळून जात आहेत. तर महिलांना या पळून जाण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचेही ती म्हणाली. माझ्या गोष्टीतून महिला धाडसी तसेच स्वतंत्र होण्यासाठी प्रोत्साहित होतील. तसेच देशातील कायदेही बदलावेत अशी इच्छाही राहफ हिने व्यक्त केली. जगासमोर देशाचे अशाप्रकारे चित्र उभे राहील्यानंतर काहीतरी बदल व्हावेत अशी आशा आहे.”