Air India Flight : एअर इंडियाच्या विमानात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीवरून लखनौ विमानतळावर पोहोचलेल्या एअर इंडियाच्या एका विमानात एक प्रवासी मृतावस्थेत आढळून आला आहे. या घनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. लखनौच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात शुक्रवारी सकाळी ८.१० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, एअर इंडियाचे क्रमांक एआय २८४५ हे विमान नवी दिल्लीहून लखनौत दाखल झाले होते. विमान प्रवासादरम्यान या प्रवाशाला झोप लागली होती. मात्र, विमान नवी दिल्लीहून लखनौच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग झाल्यानंतरही तो प्रवाशी उतरलाच नाही. विमानाचं लँडिंग झालं पण तरीही प्रवाशी न उतरल्यामुळे क्रू मेंबर्सना संशय आला. त्यानंतर क्रू मेंबर्सनी प्रवाशाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्या प्रवाशाचा सीट बेल्ट काढला, पण त्यानंतर क्रू मेंबर्सनाही मोठा धक्का बसला.

विमानातील क्रू मेंबर्सनी त्या प्रवाशाचा सीट बेल्ट काढल्यानंतर तो प्रवाशी मृत झाला असल्याचं आढळून आलं. हे पाहून एकच गोंधळ उडाला. यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाची तपासणी केली, तेव्हा त्याचा मृत्यू झाला असल्याची पुष्टी झाली. असिफुल्लाह अन्सारी असं या प्रवाशाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, प्रवाशाने सीटबेल्ट लावलेला होता, याचा अर्थ त्याचा विमान हवेत असतानाच मृत्यू झाला असावा असा अंदाज लावला जात आहे.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितलं की या प्रवाशाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? याची माहिती आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर स्पष्ट होईल. पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला असल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.

या आधीही घडली होती अशीच घटना

दरम्यान, याआधी १८ मार्च अशाच प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर आली होती. लखनौ विमानतळाच्या बोर्डिंग गेटकडे जात असताना एक महिला प्रवासी अचानक खाली पडली होती. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तेथे महिलेचा मृत्यू झाला होता. इंडिगोच्या फ्लाइटने ही महिला कर्नाटकला जात होती. विमानातळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, बेंगळुरूला जाणारी महिला टर्मिनल-३ च्या वरच्या मजल्यावर असलेल्या बोर्डिंग गेटजवळ असताना तिची प्रकृती खालावली होती, त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

Story img Loader