नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने विजय मिळवला. “हा आपला सांघिक विजय आहे आणि आगामी निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवी आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार रहावे”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या संसदीय सदस्यांच्या बैठकीत केले असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून त्यानिमित्ताने नेहमीप्रमाणे भाजपाच्या खासदारांची बैठक सपन्न झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदी येताच, सर्व खासदारांनी उभे राहून घोषणाबाजी करत, टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींचा सत्कार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळविल्यानंतर ही पहिलीच संसदीय सदस्यांची बैठक आहे. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, तीन राज्यात मिळालेल्या विजयामुळे हे निश्चित झाले की, आपल्या कामाच्या आधारावर आपण पुन्हा सत्ता मिळवू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी भाषणात म्हणाले की, सलग दोनदा सत्ता मिळविण्यात भाजपाचे प्रमाण इतर पक्षांच्या तुलनेत ५७ टक्के एवढा आहे. काँग्रेसचे दुसऱ्यांदा सत्ता मिळविण्याचे प्रमाण २० टक्क्यांच्याही खाली आहे. तर प्रादेशिक पक्षांचा दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे प्रमाण ४९ टक्के एवढे आहे. भाजपाचे तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्याचे प्रमाण ५९ टक्के आहे, तर काँग्रेसने हल्लीच्या काळात कोणत्याही राज्यात एकदाही तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केलेली नाही.

हे वाचा >> Parliament Winter Session 2023: इंडिया की भारत? शिक्षण मंत्रालयानं NCERT च्या ‘त्या’ शिफारशीवर दिलं स्पष्टीकरण; म्हणे, “भारतीय भाषेत…”

केंद्र सरकारच्या योजना आणि त्याच्या लाभार्थ्यांचा प्रचार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना या यात्रेत सक्रिय सहभाग नोंदविण्याची सूचना केली. झारखंडमधून १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी ही यात्रा सुरू केली. २५ जानेवारी २०२४ पर्यंत सदर यात्रा चालणार आहे.

मी लहान कार्यकर्ता, मोदीजी म्हणू नका

द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या माहितीच्या आधारे सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना ‘मोदीजी’ न बोलण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “लोक मला मोदी या नावाने ओळखतात. त्यामुळे खासदारांनी मला मोदीजी किंवा आदरणीय मोदीजी म्हणून संबोधित करू नये. मी आजही पक्षाचा एक छोट कार्यकर्ता आहे. मी जनतेच्याच कुटुंबाचा एक भाग आहे, असे मी समजतो. लोकांना मोदी म्हणून मी जवळचा वाटतो, त्यामुळे माझ्या नावापुढे श्री किंवा आदरणीय असे काही लावू नका.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A small karyakarta at bjp parliamentary party meeting pm urges leaders to not address him as modiji kvg